gajanan kirtikar : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात एकनाथ शिंदे यांच्या बाजूलाच बसलेले ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी शिंदेंचं टेन्शन वाढवलं आहे. किर्तीकर यांनी त्यांच्याच पक्षाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. न्यायालयात सर्व काही समोर येईल व जो निर्णय येईल, तो सर्वांना स्वीकारावाच लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या किर्तीकर यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तर, शिंदे गटानं रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवलं होतं.
ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. त्यात किर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. मात्र, मतमोजणीत घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी या स्वत: यात सहभागी असल्याचा आरोप आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडं व गरज पडल्यास कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया बोलकी आहे. मुलाचा प्रचार न करणाऱ्या किर्तीकर यांनी या निकालावर संशय व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 'उत्तर-पश्चिममधील मतमोजणी प्रक्रिया जी आहे. यात काही गोष्टी संशयास्पद आहेत. निवडणुकीचा निर्णय अधिकारी नेमण्याचे काही निकष असतात. त्यानुसारच तो नेमावा लागतो. मात्र, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वंदना सूर्यवंशी या महिला अधिकाऱ्याची निवड केली. त्यांची पार्श्वमूमी फारशी चांगली नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्या संशयास्पद अधिकारी आहेत. त्याच्याकडून ही कृती झालेली आहे, असं किर्तीकर म्हणाले.
आता समोरचे लोक न्यायालयात जाण्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी तशी दाद मागितल्यास आमच्या पक्षाला उत्तर द्यावं लागेल. निवडणुकीसाठी आरओ (Returning Officer) नेमताना काही निकष कलेक्टरला पाळावे लागतात. सूर्यवंशी यांना आरओ म्हणून नेमलं कोणी? त्यासाठी कोणी शिफारस केली? या सगळ्याची उत्तरं निवडणूक आयोगाकडं द्यावी लागतील, असं किर्तीकर म्हणाले. अर्थात, ‘कोर्टाचा निर्णय स्वीकारावा लागतो. तो आम्ही स्वीकारूच,’ असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या