संतापजनक! प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतापजनक! प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

संतापजनक! प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Mar 10, 2024 09:45 PM IST

Gadchiroli Crime news : गडचिरोलीत आरोग्य केंद्रातील शिपायाने ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार (सांकेतिक छायाचित्र)
५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार (सांकेतिक छायाचित्र)

गडचिरोलीमधून एक घृणास्पद बातमी समोर आली आहे. घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत असून त्याने स्वतःच्या शासकीय निवासस्थानात चिमुरडीवर अत्याचार केले. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात शनिवारी (९ मार्च) रोजी ही संतापजनक घटना समोर आली. 

संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचारानंतर मुलीची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेवर उपचार करण्यात हेळसांड करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

ही घटना ९ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. पीडित मुलीच्या घराशेजारीच आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे. या वसाहतीत आरोपी संतोष कोंडेकर हा तिथे एकटाच राहतो. घरासमोर खेळत असलेल्या मुलीला त्याने खाऊचे आमिष दाखवून मुलीला घरात बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. मुलीने घरी येऊन घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले, पण तेथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.

या घटनेनंतर आरोपी संतोष कोंडेकर फरार झाला आहे. सुरूवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई पदावर नियुक्त आहे. त्याचा शोध सुरु आहे.

मुलीची प्रकृती गंभीर बनल्यानंतर १० मार्चला सकाळी नागपूरला हलविण्यात आले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण एटापल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर