Gadchiroli Bhamragarh News: आत्महत्या करण्यासाठी नदीपात्रात उडी घेतलेल्या महिलेचे जवानाने प्राण वाचवले. गडचिरोलीच्या भामरागड येथे गुरुवारी (२२ ऑगस्ट २०२४) ही घटना घडली. आपली मुलगी पोलीस भरती परीक्षेत अनुतीर्ण झाल्यामुळे संबंधित महिला नैराश्यात होती. यातूनच महिलेने पर्लकोटा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्यूआऱटी जवानाने तिचा हा प्रयत्न हाणून पाडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीमधील भामरागड येथील एका महिलेने २२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पर्लकोटा नदी पुलाच्या सुरक्षा कठड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. यानंतर नागरिकांनी तात्काळ स्थानिक क्यूआरटी जवानांशी संपर्क केला. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी वेळ न घालवता पाण्यात उडी घेऊन महिलेला वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
युनिट परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाने पॅरासिटामॉलच्या ६० गोळ्या खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलाला मळमळ, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याच्या पालकांना समजले. पालकांनी तात्काळ त्याला घराजवळील खासगी नर्सिंग होममध्ये नेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलविण्यात आले. या मुलाच्या यकृताला गंभीर इजा झाली असली तरी सध्या तो धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलाला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले.
आरएचसीचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी सांगितले की, मुलाची प्रकृती सुधारत असून त्याला जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. जलद आणि कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्थापनामुळे त्यांची तब्येत सुधारली असून यकृत प्रत्यारोपणाची गरज भासणार नाही. नैराश्य, चिंता आणि निराशेच्या भावनांसह किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजेबद्दल तज्ञांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलाच्या वर्तनावर लक्ष ठेवले पाहिजे, विशेषत: जेव्हा ते अशा परिस्थितीत असतात. एखादा मुलगा तणावात दिसल्यानंतर पालकांनी त्यांच्याशी चर्चा करावी. शिक्षणाला महत्त्व देणे चांगले आहे. पण मुलांवर अतिरिक्त दबाव टाकणे टाळावे, असेही त्यांनी म्हटले आहे.