गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने ६ महिला बुडाल्या असून त्यापैकी एकीचा मृतदेह सापडला आहे. मिरची तोडण्यासाठी जात असताना महिलांवर काळाने घाला घातला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. बेपत्ता महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरजवळ वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे.
महिला मिरची तोडण्याच्या कामासाठी जात होत्या. बुडालेल्या एक महिलेचा मृतदेह मिळाला असून अद्याप पाच महिला बेपत्ता आहेत. गणपूर घाटावरून मिरची तोडण्यासाठी या महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत बोटीतून जात होत्या. नाव पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली. नावेत सात महिला व नावाडी होते. नाव उलटल्याने सर्वजण बुडाले. यातील एक महिला व नावाडी नदीतून पोहत सुखरुप बाहेर आले. तर सहा महिला बुडाल्या त्यातील एकीचा मृतदेह मिळाला आहे.
नावेत ८ लोक होते. ते सर्व गनपूरचे रहिवासी होती. सात महिलांपैकी सारूबाई कस्तूरे सुखरूप बाहेर आली असून जीजाबाई राउत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर रेवंता हरिदास झाड़े, पुष्पा मुक्तेश्वर झाडे, माया बाई अशोक राउत, सुषमा सचिन राउत आणि बुदाबाई देवाजी राउत या महिला पाण्यात बेपत्ता आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबतही चौकशी सुरू आहे.
संबंधित बातम्या