2 burnt alive In Gadchiroli: गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात खळबळजनक घटना घडली. काळ्या जादूच्या संशयातून दोन जणांना जिवंत पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी गावातील १५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, देउ अटलामी आणि जमनी तेलमी असे होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही तालुक्यातील बसेरवाडा गावात वास्तव्यास होते. दरम्यान, बुधवारी रात्री आरोपी गावकऱ्यांनी अटलामी आणि तेलमी यांना त्यांच्या घरातून ओढून नेले आणि त्यांना तीस मारहाण केली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना जिवंत पेटवून दिले. यानंतर त्यांचे मृतदेह गावातील एका नाल्यात फेकून दिले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधून काढले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. काळी जादू केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दोघांची हत्या केली. तेलमीच्या हत्येत तिचा पती आणि मुलाचाही सहभाग असल्याचे पोलिसांना संशय आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली. अजय बापू तेलामी, भाऊजी शत्रु तेलामी, अमित सामा मडावी, मिर्चा तेलामी, बापू कंद्रू तेलामी, सोमजी कंद्रू तेलामी, दिनेश कोलू तेलामी, श्रीहरी बिरजा तेलामी, मधुकर देशू पोई, अमित उर्फ नागेश रामजी तेलामी, गणेश बाजूकर, मडक बाजूकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी बारसेवाडा येथील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी कलम ३०२, ३०७, २०१, १४३, १४७, १४९ कायद्यांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संबंधित बातम्या