CNG Fuel Price Hike : राज्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी राज्यातील नागरिकांना इंधनदारवाडीचा फटका बसला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ होणार आहे. ही वाढ दोन रुपयांनी करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गॅस विक्री करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने केली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस प्रति किलोमागे २ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे उद्या पासून मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजी ७७ रुपये प्रति किलोदराने मिळणार आहे.
पुणे शहरात देखील सीएनजी गॅसचे दर किलोमागे २ रुपयांनी वाढले आहेत. या पूर्वी पुण्यात सीनजी प्रती किलो ८५.९० प्रति किलो प्रमाणे होते. तर नवे दर ८७.९० प्रति किलो झाले आहे. हा दर आजपासूनच लागू आहे, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी माहिती दिली आहे.
सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला आहे. यामुळे महानगर गॅसच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर ११६० रुपयांपर्यंत गेला आहे. सरकारने सलग दुसऱ्या महिन्यामध्ये शहरातील गॅस वितरक कंपन्यांसाठी अॅडमिनिस्टर्ड प्राइज मेकॅनिझम अॅलोकेशनमध्ये २० टक्क्यांची कपात केली आहे. सीएनजीची २ रुपयांनी झालेली वाढ ही २.६ टक्के आहे.