Saloon Rates In Maharashtra: नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कटिंग, दाढीसह ब्युटीपार्लरच्या दरात १५ ते टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. हे नवे दर येत्या १ जानेवारीपासून लागू असतील. महागाईमुळे दरात वाढ करण्यात येत असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आधीच महागाईन त्रस्त असलेल्या नागरिकांच्या खिशावर नववर्षापासून आणखी ताण पडणार आहे. येत्या १ जानेवारीपासून सलून आणि ब्युटीपार्लरच्या दरात १५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विष्णू वखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सलूनमधील वस्तूंच्या किंमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वस्तू व सेवाकर, प्राप्तिकर, व्यावसायिक कर, दुकानांचे भाडे, वीजदेयके, कारागिरांचा पगार यांसाठी खर्चाचा ताळमेळ जुळवावा लागतो. यामुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात वाढ करण्यात आली.'
'महागाईच्या झळा प्रत्येक क्षेत्राला जाणवत आहेत. असे असताना आता राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवांचा खर्चही वाढणार आहे. महागाईमुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सेवादरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, सलून आणि ब्युटीपार्लरच्या दरात १५ ते ३० टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. येत्या १ जानेवारी २०२५ पासून हे नवे दर लागू होतील', असे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी म्हटले आहे.
राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे अंडीचे दर वाढले आहेत. पुण्यात गावरान अंडी प्रति डझन १४० रुपयांनी मिळत आहेत. तर, इंग्लिश अंड्याचा दर प्रति डझन ९० रुपयांवर पोहोचला आहे. सध्या प्रतिनग गावरान अंड्याची किंमत १२ रुपये आहे. तर, इंग्लिश अंडे साडेसात रुपयांना विकले जात आहे. डिसेंबर महिना सुरू झाला की थंडीचे प्रमाण वाढते. यामुळे नियमित आहारात अंड्याचा समावेश होतो.
संबंधित बातम्या