Prema Purao Death: स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव यांचे निधन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prema Purao Death: स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव यांचे निधन

Prema Purao Death: स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव यांचे निधन

Jul 02, 2024 08:44 PM IST

Prema Purao Death : स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले.

सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे आज पुण्यात निधन
सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे आज पुण्यात निधन

Prema Purao Dies: स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापिका पद्मश्री प्रेमाताई पुरव यांचे आज (२ जुलै २०२४) पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या इच्छानुसार कुठलेही विधी करण्यात आली नाही. प्रेमाताई यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रेमाताई पुरव यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३५ रोजी गोव्यात झाला. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी आपला भाऊ काशिनाथ याच्यासोबत स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला होता. पुढे त्या गोवा मुक्ती संग्रामात कार्यरत राहिल्या. तिथेच त्यांनी कृष्णा मेणसे यांच्याकडून साम्यवादाची दीक्षा घेतली. यानंतर त्या मुंबईत आल्या, जिथे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कम्युनमध्ये काही काळ योगदान दिले. प्रेमा ताई यांचा दादा पुरव यांच्याशी प्रेमविवाह झाला. दादा हे देशातील मोठी संघटना एआयबीइएचे प्रमुख नेते होते. निवृत्तीनंतर दादा पुरव आणि प्रेमाताई संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सहभागी झाल्या होत्या.

प्रेमाताई यांनी १९६० नंतर भारतीय महिला फेडरेशन, गिरणी कामगार युनियन, महागाई प्रतिकार संयुक्त महिला समितीसोबत काम केले. १९७५ मध्ये प्रेमाताई यांनी दादा पुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अन्नपूर्णा महिला मंडळाने गरीब खानावळवाल्या महिलांना सावकारीतून मुक्त करण्यासाठी काम केले. त्यावेळी आणीबाणीचा काळ होता. अल्प व्याज दराने दुर्बल घटकातील व्यक्तींना कर्ज देण्याची योजना अस्तित्वात आली. त्याचा फायदा हजारो खानावळ चालवणाऱ्या महिलांना झाला.

दादा पुरव यांचे १९८२ मध्ये अकाली निधन झाले. दादा पुरव यांच्या मृत्यूनंतर प्रेमाताई महिला चालवत असलेल्या खाद्य पदार्थ व्यवसायात उतरल्या. त्यातून त्यांनी अनेक निराधार महिलांना सक्षम करण्याचे कार्य पुढे सुरू ठेवले. त्यांची जन्मभूमी गोवा असली, तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती.

२००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान

प्रेमाताई यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने २००२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. या व्यतिरिक्त त्यांना दुर्गाबाई देशमुख पुरस्कारासारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. प्रेमाताईना ‘अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थेचा स्त्री रत्न पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीच्या पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले होते.

वैकुंठ स्मशानभूमीत प्रेमाताई यांना शेवटचा निरोप

प्रेमाताई गेल्या वीस वर्षांपासून पुण्यात त्यांच्या मुलीच्या घरी राहत होत्या. प्रेमाताई यांना तीन मुली आहेत. डॉ. मेधा पुरव-सामंत, विशाखा पुरंदरे, माधवी कोलांकरी अशा त्यांच्या तिन्ही मुलींची नावे आहेत. त्यांच्या तीन कन्या, तीन जावई , नातवंडे, तसेच अनेक जवळचे नातेवाईक, स्नेही, कार्यकर्ते हे वैकुंठ स्मशानभूमीत प्रेमाताईना शेवटचा निरोप द्यायला हजर होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर