जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, लेखक व समाजवादी विचारवंत कृष्णा मेणसे यांचं बेळगाव येथे निधन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, लेखक व समाजवादी विचारवंत कृष्णा मेणसे यांचं बेळगाव येथे निधन

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, लेखक व समाजवादी विचारवंत कृष्णा मेणसे यांचं बेळगाव येथे निधन

Jan 14, 2025 06:53 AM IST

Freedom fighter Krishna Mense passes away : गोवा मुक्ती कार्यकर्ते, गांधीवादी, लेखक आणि कामगार संघटनांचे नेते असलेले स्वातंत्र्यसैनिक कृष्णा मेणसे यांचं सोमवारी बेळगाव येथे निधन झालं.

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, लेखक व समाजवादी विचारवंत कृष्णा मेन्से यांचं बेळगाव येथे निधन
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, लेखक व समाजवादी विचारवंत कृष्णा मेन्से यांचं बेळगाव येथे निधन

Freedom fighter Krishna Mense passes away : ज्येष्ठ कामगार नेते,  समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक व सीमालढ्यातील बिनीचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे सोमवारी (दि १३) दुपारी वृद्धापकाळामुळे बेळगाव येथे निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, सीमालढा अशा विविध चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला.

कॉ. कृष्णा मेणसे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्राचार्य आनंद मेणसे, लेखक संजय मेणसे हे मुलगे व कन्या लता पावशे, श्रीमती नीता पाटील व नातवंडे असा परिवार आहे.

कृष्णा मेणसे यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. परंतु त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना देण्यात येणारी पेन्शन किंवा इतर फायदे स्वीकारण्यास नकार दिला. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आणि नेते होते. त्यांनी अनेक वर्षे बेळगाव येथील इंडियन अॅल्युमिनियम कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते महाराष्ट्र आणि कर्नाटकात सक्रिय असलेल्या अंधश्रद्धाविरोधी लीगच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये देखील सामील होते. तसेच महाराष्ट्र एकीकरण चळवळीत देखील त्यांनी सहभाग घेतला होता. ते लेखक आणि थोर विचारवंत देखील होते. त्यांनी डाव्या चळवळीशी संबंधित अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी प्रदीर्घ लिखाण केलं आहे. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी हो ची मिन्ह यांचे चरित्र, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, अशा तोडल्या बेड्या, असा लढलो, असा घडलो, गोठलेली धरती पेटलेली मने, गोवा मुक्ती आंदोलन, डॉ. आंबेडकर आणि बुद्धधर्म याबरोबर वीरगाथा या कन्नड पुस्तकाचा अनुवाद, परिक्रमा प्रवासवर्णन, वीरराणी कित्तूर चन्नमा असे विपुल लेखन केले आहे.

सच्चा कम्युनिस्टवादी, कडवा सीमासत्याग्रही, उत्कृष्ट वाकपटू, लेखक, संपादक, अशा विविध भूमिकेतून त्यांची कारकीर्द बेळगाव परिसरात सतत गाजत राहिली. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. आपल्या विचारांची प्रामाणिक असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. सीमाभागात 'आप्पा' या आदरार्थी नावाने परिचित असणारे कॉ. कृष्णा मेणसे सीमालढ्याचा चालता बोलता इतिहास होता. अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सीमा लढा यात त्यांनी  मोठी  कामगिरी केली आहे. 

महाराष्ट्र सीमाप्रश्नी मोठं योगदान 

सीमाप्रश्नाच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी या प्रश्नी १९५६ साली १  वर्षे कारावास भोगला. आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मराठीत मांडली. त्यांना अलीकडेच 'राष्ट्रवीर' कार शामराव देसाई, गडहिंग्लज येथील गांधी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते. चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना त्यांनी पत्रकारिताही केली. हेमंत नावाचे मासिक आणि नंतर साम्यवादी नावाने साप्ताहिक सुरु करून आपल्या लेखणीतून कष्टकरी श्रमिकांचे प्रश्न मांडले. 

समाजवादी विचारांचा मोठा नेता हरपला

लेखक आणि दीर्घकाळापासून त्यांचे सहकारी असलेले सिद्धनगौडा पाटील म्हणाले की, मेणसे हे कर्नाटकातील कामगार आणि कम्युनिस्ट चळवळीचे एक प्रमुख नेते होते. कर्नाटकच्या एकीकरणानंतर संपूर्ण राज्यात सीपीआयची चळवळ उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोवा मुक्ती चळवळीत सीपीआयने राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली, परंतु या प्रदेशातील काँग्रेस नेते सामील झाले नाहीत, असे ते म्हणाले. मेणसे यांनी बेळगावी आणि कारवार येथून विविध मार्गांनी गोव्यात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत केली, असेही ते म्हणाले.

स्थानिक समन्वयक जी.व्ही. कुलकर्णी म्हणाले की,  मेणसे यांनी मार्क्सवाद आणि कामगार चळवळ, सांप्रदायिक सौहार्द आणि कामगार हक्कांवर अनेक पुस्तके लिहिली. मेणसे यांच्या निधनामुळे एआयआयईए आणि आयईयू सारख्या कामगार संघटनांनी शोक व्यक्त केला आहे.

सोमवारी रात्री आठ वाजता सरस्वती नगर येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यापार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर