मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : म्हाडाला बिल्डरने गंडवले; वेळेत सदनिका बांधून न देता ४ कोटींची फसवणूक

Pune Crime : म्हाडाला बिल्डरने गंडवले; वेळेत सदनिका बांधून न देता ४ कोटींची फसवणूक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 05, 2022 02:52 PM IST

म्हाडाने दिलेल्या मुदतीत घरे पूर्ण बांधून न देता म्हाडाची आणि ग्राहकांची तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बाधकांम व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Crime News (HT_PRINT)

पुणे : पुण्यात माफक दरात घर खेरेदीसाठी म्हाडा सदनिका उपलब्ध करून देत असतात. यासाठी खासगी बांधकाम व्यवसायिकांची मदत घेतली जाते. २० टक्के घरे ही अशा प्रकल्पात राखीव ठेवली जाते. अशाच एका प्रकल्पात  पुण्यात एका बांधकाम व्यवसायिकाने म्हाडाने दिलेल्या मुदतीत घरे बांधून न देता ग्राहकांची आणि नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यावसायिकाने तब्बल ४ कोटी रुपयांनी शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज येवला (रा. स्नेहल रेसीडन्सी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाडाचे व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात या फसवणुकी प्रकरणी फिर्याद दिली आहे. म्हाडा तर्फे येवला यांच्या कंपनी मार्फत पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणी येथे भूमी ब्लेसिंग गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. जवळपास ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळातील प्रकल्पात २० टक्के क्षेत्रफळावर विकसकाने म्हाडाला सदनिका उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. झालेल्या कारानुसार २१ जानेवारी २०१९ रोजी भूमी ब्लेसिंग प्रकल्पातील अठरा सदनिकांची लॉटरी काढण्याच्या प्रस्ताव येवला यांनी सादर केला होता. जून २०१९ मध्ये लाभार्थ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर १५ लाभार्थ्यांना देकार पत्र (अलॅाटमेंट लेटर) देण्यात आले.

दरम्यान, लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर विकसकास प्रत्येक लाभार्थ्याकडून ६० ते ७० टक्के रक्कम मिळाली. रेरा कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत बांधकाम पूर्ण करून सदनिकांचा ताबा लाभार्थ्यांना देणे बंधनकारक असताना अद्याप एकाही लाभार्थ्याला सदनिकेचा ताबा मिळालेला नाही. यासंदर्भात लाभार्थ्यांनी म्हाडाकडे तक्रार दिली. येवला यांना स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतरही पंधरा सदनिकांचा ताबा न देता लाभार्थ्यांची आणि सरकारची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली. यामुळे ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel