Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील देवास येथील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिंनींसह एका महिला शिक्षिकेचे एकत्र नग्न फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्व विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिका कुटुंबासह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. परंतु, पोलीस तपासात समोर आलेली माहितीने सगळ्यांना धक्काच बसला.
विद्यार्थीनी आणि शिक्षिकेचे अश्लील फोटो काढणारे दुसरे कोणी नसून त्याच शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी आहेत. या प्रकरणी चार मुलांची नावे समोर आली आहेत. शाळेत असताना हे चौघेही टॉपर असायचे. चौघांपैकी काही इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. तर, काही नीटची तयारी करत आहेत. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एडिटिंग टूल्सच्या मदतीने मुलींचे न्यूड फोटो बनवणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उज्जैन रोडवरील सेंट मेरी शाळेची ही घटना आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिंनी कुटुंबीयांना माहिती दिली. पोलीस लाइन स्टेशनच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात चार मुलांची नावे समोर आली. हे चौघेही एकाच शाळेचे विद्यार्थी असल्याचे समजताच पोलीस, विद्यार्थी आणि शाळा प्रशासन आश्चर्यचकित झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्यांनी आणि महिला शिक्षकांचे फोटो एडिट करून त्यांना अश्लील बनवायचे, असे मुलांनी चौकशीत सांगितले. त्यानंतर ते फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचे. चारपैकी एक मुलगा एसआयटी कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. एक जण उज्जैनच्या सरकारी महाविद्यालयात अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तिसरा मुलगा नीटची तयारी करतो. चौथा बेंगळुरू येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चारही मुलांनी इन्स्टाग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. शाळेच्या काळात हे चौघे मित्र होते. ते इन्स्टाग्रामवरून मुलींचे फोटो डाऊनलोड करायचे. त्यानंतर एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे त्यांचे अश्लील फोटो बनवायचे. इंस्टाग्राम ग्रुप व्यतिरिक्त ते इतर ठिकाणीही फोटो शेअर करायचे. या घृणास्पद कृत्यातील मुख्य आरोपी अल्पवयीन विद्यार्थी आहे. सध्या तरी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेने शाळा प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या