दसऱ्याच्या दिवशी सगळीकडे रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. परंतु कडेकोड बंदोबस्त असलेल्या कारागृहाच्या आवारात रावण दहनाचा कार्यक्रम झाल्याचं तुम्ही यापूर्वी ऐकलं नसणार. कारण कडेकोट बंदोबस्तातील कारागृहांमध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटके घेऊन जाण्यास किंवा पुतळा दहन करण्याची परवानगी नसते. मात्र गोव्यातील कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दसऱ्याच्या दिवशी तब्बल ९ फूट उंच रावणाचा पुतळा उभारून त्यात फटाके भरून रावणाच्या पुतळ्याचं जल्लोषात दहन केल्याच्या घटना घडली आहे. या घटनेमुळं कोलवाळ कारागृहाच्या आतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोव्यात कारागृहाच्या आवारात कैद्यांनी रावणाचा पुतळा जाळण्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोवा तुरुंग प्रशासन खडबडून जागं झालं आहे. गोव्याचे पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) यांनी या घटनेची गंभीर दखल घेत झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, चौकशी होईस्तोवर जेलमध्ये कार्यरत एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन जेलर्सना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कोलवाळ येथील कारागृहात कोणत्याही प्रकारची स्फोटके नेण्यास आणि साठवण्यास बंदी आहे. या कारागृहामध्ये कैद्यांना रावणाचा पुतळा उभारण्यासाठी कैद्यांना अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. ‘या घटनेची चौकशी करण्यात येत असून चौकशीच्या कालावधीदरम्यान हे चार अधिकारी निलंबित राहणार आहेत.’ असं एका तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोलवाळ कारागृहात कार्यरत सहायक जेल अधिक्षक चंद्रकांत हरिजन, जेलर महेश फडते, जेलर अनिल गावकर आणि जेलर रामनाथ गौडे यांचा समावेश आहे. गोवा राज्याचे पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) ओमवीर सिंह यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहे.
कारागृहाच्या आवारात बंदी असलेल्या गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही, याबाबत जेल अधिकारी तसेच कैद्यांमध्ये कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने निलंबनाची कारवाई करण्याच आल्याचं एका तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं.