Amravati Bus Accident News: अमरावती येथील पराटवाडी ढाणी मार्गावरील सेमाडोहजवळ मेळघाटातील वळणदार रस्त्यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस जवळच्या पुलाखाली कोसळून अपघात झाला. ही घटना आज सकाळी (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस सकाळी सहा वाजता अमरावती येथून धारणीला जात होती. परंतु, सेमाडोह येथील भूतखोरा परिसरात वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ३० जखमी झाले. यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित जखमी झालेल्या प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सेमाडोह येथील रहिवाशांसह व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी देखील बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न काढण्यात आहे. चिखलदरा आणि धारणी पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. या अपघातातील मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात रविवारी पहाटे कार आणि कंटेनर ट्रकयांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अंबेजोगाई-लातूर रस्त्यावर मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातील जगलपूर येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसात कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. बर्दापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने मृतदेह आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.