पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा खालापूरच्या तलावात बुडून मृत्यू-four college students from mumbai died after drowning in lake khalapur who go on picnic ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा खालापूरच्या तलावात बुडून मृत्यू

पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा खालापूरच्या तलावात बुडून मृत्यू

Jun 21, 2024 07:00 PM IST

Mumbai News :खालापूरला पिकनिकला गेलेल्या मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कॉलेजचे ३७ विद्यार्थी-विद्यार्थिनी पिकनिकला गेले होते.

मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा खालापूरच्या तलावात बुडून मृत्यू (file pic)
मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा खालापूरच्या तलावात बुडून मृत्यू (file pic)

मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पावसाळी सहल खालापूरला गेली होती. यातील चार विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. खालापूर तालुक्यातील वावर्ले ग्रामपंचायत हद्दीतील पोखरवाडी येथील सत्य साई बाबा धरणात हे तरुण बुडाले. महाविद्यालयातील ३७ तरुण-तरुणी सहलीला गेले होते. खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

एकलव्य सिंग, इशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा, अशी बुडालेल्या चौघांची नावं आहेत. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं आहे.

पावसाळी सहलीला जाणे चार तरुणांच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे. वांद्रे पूर्वमधून सहलीला गेलेल्या तरुणांना खालापूरच्या तलावात पोहण्याच्या मोह झाला. यातील चार तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. अन्य तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. एकाला अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तरुण वांद्र्याच्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. या कॉलेजचे एकूण ३७ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खालापूरमध्ये फिरायला आले होते.

खालापूरच्या पोखरवाडी येथील तलावात पोहताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे चार जण बुडाले. पावसाला सुरूवात होताच अनेक जण वर्षा पर्यटनाचा बेत आखतात. या काळात महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे पिकनिकला जायचं प्रमाण वाढतं. मात्र अनेकदा तरुणाईकडून उत्साहाच्या भरात जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केली जाते. यामुळे अनेक दुर्घटना होतात. 

आदई डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या ९ जणांची सुटका -

पनवेलमधील असई गावातील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या ९ विद्यार्थ्यांची खांदेश्वर पोलीस आणि पनवेल अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली.  पनवेलमधील १६ ते २० वयोगटातील ६ विद्याथी व इतर तीन विद्यार्थी आदई गवातील रहिवाशी आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ट्रेकिंगला सुरुवात केली. त्यांना खाली उतरण्यास अडचण येत असल्याने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

Whats_app_banner