Mumbai: मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्यावर घरात घुसून हल्ला
Ashok Pradhan: मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान यांच्यावर घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला.
Mumbai University: मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक प्रधान यांच्यावर रविवारी मदत मागण्यासाठी गेलेल्या एक महिला आणि एका अल्पवयीन मुलांसह पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. प्रधान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस डॉ. प्रधान यांच्या घरी पोहोचले. तसेच त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एका खाजगी संस्थेच्या शैक्षणिक समितीचा भाग असलेले ८४ वर्षीय प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी अव्यावसायिक वर्तन आणि अनैतिक कामाच्या तक्रारींनंतर प्राध्यापक संजय जाधव यांना निलंबित केले होते. यानंतर वेतन बंद झाल्याने संजय जाधवला आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागले.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी संजय जाधव आणि त्यांचे साथीदार प्रधान यांच्या निवासस्थानी गेले, तेव्हा अशोक प्रधान यांच्या पत्नी घरात हजर होत्या. त्यावेळी जाधव यांनी त्यांना पुन्हा कामावर घेण्याची विनंती केली. मात्र, चर्चेचे रुपांतर वादात झाले आणि जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी प्रधान यांच्यावर हल्ला केला.
यानंतर प्रधान यांच्या पत्नीने ताबडतोब पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अशोक प्रधान यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर किरकोळ उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १४३,१४७, ४५२, ३४१, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विभाग