Sanjay Pandey news : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. लवकरच या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर काही पक्ष उमेदवारांची चाचपणी करणार आहे. अशातच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या बाबत त्यांनी फेसबूक पोस्ट केली असून वर्सोवा विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील या बाबत त्यांनी अद्याप घोषणा केली नाही.
फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सध्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. संजय पांडे हे वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढणार असून रविवारी संजय पांडे यांनी वर्सोवा येथील झुलेलाल मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट करत, लिहिले की, वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण प्रयत्न करू..." असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे हे फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आले होते. संजय पांडे यांनी तब्बल आठ वर्ष त्यांच्या कंपनी मार्फत तब्बल ८ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या काही कर्मचार्यांचे फोन हे टॅप केले होते. या प्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर कारवाई केली होती. पांडे यांनी आयएसईसि सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या रेड सर्व्हर उपकरणांद्वारे हे फोन टॅप केले होते. या प्रकरणी त्यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली होती. चित्र रामकृष्ण प्रकरणी देखी त्यांनी २००१ मध्ये एक फेक ऑडिट कंपनी तयार केलेली. या प्रकरणात त्यांनी हे चुकीचे फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देखील दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. यानंतर त्यांनी पुन्हा पोलिस सेवा सुरू केली. दरम्यान, त्यांचा मुलगा व आई या कंपनीचे संचालक होते. २०१० ते १५ दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, २०२२ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.