Mhada Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाकडून २०३० घरांसाठी लॉटरीची सोडत आज काढण्यात आली. मुंबईत हक्काचं घर घेण्याचं २०३० जणांचं स्वप्न साकार झाले आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना घर मिळालं आहे. त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (raju shetti) यांनाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आहे. या घराची किंमत १ कोटी २० लाख १३ हजार ३२३ रुपये इतकी आहे.
म्हाडाच्या घरासाठी १ लाख १३ हजार जणांनी अर्ज केला होता. यापैकी २०३० भाग्यवान अर्जदारांना आपल्या हक्काचं घर मिळालं आहे. लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत, असे गृहनिर्माण मंत्री अतूल सावे यांनी जाहीर केले आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून या घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्या कोट्यातून तीन जणांना घरे मिळणार होती. मात्र त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे घर निश्चित झालं होतं. आज त्याची औपचारिक घोषणा झाली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी आता मुंबईकर होणार आहेत. त्यांना मुंबईतील पवई भागात घर मिळालं आहे. त्यांना पवईतील मध्यम श्रेणीतील घर लागलं असून या घराची किंमत जवळपास १ कोटी २० लाख रुपये एवढी आहे. या कोट्यात एकूण ३ घरं उपलब्ध होती, मात्र त्यासाठी केवळ एकच अर्ज आल्यानं राजू शेट्टी यांना घर मिळालं आहे.
म्हाडाच्या लॉटरीमध्ये अभिनेत्री गौतमी देशपांडे, हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने, अभिनेता गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांनाही घरं मिळाली आहेत. पवईमधील म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घरांची किंमत जवळपास १ कोटी ७८ लाख इतकी होती.
म्हाडाच्या २०३० घरांसाठी १ लाख १३ हजार जणांचे अर्ज पात्र ठरले होते. अल्प आणि अत्यल्प गटातील घरांसाठी सर्वाधिक अर्ज आलेले होते. या सोडतीमध्ये घर न लागलेल्यांना उद्यापासून म्हणजेच ९ ऑक्टोबरपासून अनामत रक्कम परत मिळेल.
संबंधित बातम्या