कुलाब्याची ‘मम्मी’ हरपली; काँग्रेसच्या माजी आमदार ॲनी शेखर यांचं निधन
Annie Shekhar Passes Away: काँग्रेसच्या माजी आमदार ॲनी शेखर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे.
Congress Leader Annie Shekhar Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचं राज्य विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार ॲनी शेखर यांचं रविवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राजकारण प्रवेशाआधी ॲनी शेखर सरकारी सेवेत होत्या. तरुण वयातच त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम सुरू केलं. त्या कुलाबा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलं. १९९२ साली त्या मुंबई महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. १९९७ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. त्यानंतर २००४ साली त्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. २००९ मध्ये पुन्हा त्या निवडून आल्या. २००६ ते २००९ या काळात त्यांच्याकडं चिल्ड्रन एड सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला होता.
कुलाबा मतदारसंघातील उच्चब्रू लोकांना त्या जशा जवळच्या वाटत होत्या, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेमध्येही त्या लोकप्रिय होत्या. आपल्या समर्थकांमध्ये ‘मम्मी’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या ॲनी शेखर या महिलांच्या व वंचितांच्या हक्कांसाठी सतत झगडताना दिसायच्या. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी गरिबांसाठी हक्काची घरे, महिला सुरक्षा आणि रोजगारासंबंधीचे अनेक प्रश्न विधानसभेत मांडले होते. त्यांच्या प्रयत्नांतून मंत्रालयाजवळ स्टडी सेंटर उभं राहिलं. गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा या उद्देशानं त्यांनी या स्टडी सेंटरच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला. हे सेंटर विद्यार्थ्यांसाठी २४ तास खुलं असतं. येथील स्टडी सेंटरमध्ये अभ्यास केलेली अनेक मुलं पुढं गुगल, नासा, अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामाला लागली. हे मॉडेल यशस्वी झाल्यानं मुंबईभर स्टडी सेंटर सुरू झाले. आज कुलाब्यात एकूण पाच स्टडी सेंटर आहेत. या कामाचं संपूर्ण श्रेय ॲनी शेखर यांना दिलं जातं.