suryakanta patil : शरद पवारांनी टाकला नवा डाव, भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांना पुन्हा पक्षात प्रवेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  suryakanta patil : शरद पवारांनी टाकला नवा डाव, भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांना पुन्हा पक्षात प्रवेश

suryakanta patil : शरद पवारांनी टाकला नवा डाव, भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांना पुन्हा पक्षात प्रवेश

Updated Jun 25, 2024 05:19 PM IST

Suryakanta Patil join NCP-SCP : माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पवारांच्या पुढील बेरजेच्या राजकारणाचा निदर्शक मानला जात आहे.

शरद पवारांनी नवा डाव टाकला, भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांना पुन्हा पक्षात प्रवेश
शरद पवारांनी नवा डाव टाकला, भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांना पुन्हा पक्षात प्रवेश

Suryakanta Patil join NCP-SCP : लोकसभा निवडणुकीत घरची आणि बाहेरची सर्व आव्हानं परतावून लावून दणदणीत कामगिरी करून दाखवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या माध्यमातून शरद पवार यांनी पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सूचक संकेत दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. सूर्यकांता पाटील ह्या यापूर्वी पवारांच्याच पक्षात होत्या. मात्र, २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दहा वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या पक्षात परतल्या आहेत.

सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाचं चार वेळा प्रतिनिधित्व केलं होतं. एकदा त्या आमदारही राहिल्या होत्या. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात त्यांनी केंद्रात ग्रामविकास व संसदीय कामकाज खात्याचं राज्यमंत्रीपद भूषवलं होतं.

…आणि ठिणगी पडली!

सूर्यकांता पाटील या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्षानं त्यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली. त्यामुळं त्या नाराज होत्या. सोशल मीडियातून त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

शरद पवारांचं लक्ष्य विधानसभा

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का दिल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणणारच असं त्यांनी ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं अवघ्या १० जागा जिंकून ८ जागा जिंकल्या. यापैकी बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते-पाटील, नीलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे हे उमेदवार त्यांनी अन्य पक्षातून आपल्याकडं खेचले होते. याच बेरजेच्या राजकारणाची पुनरावृत्ती त्यांनी सुरू केली आहे. सूर्यकांता पाटील यांचा प्रवेश ही त्याची सुरुवात मानली जात आहे.

सरसकट प्रवेश नाही!

पुन्हा पक्षात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांना घेणार का यावर शरद पवार यांनी आज उत्तर दिलं. 'सरसकट सगळ्यांना प्रवेश देता येणं शक्य नाही. जिथं पक्षाला मदत होईल, पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल अशांना घ्यायला काही हरकत नाही. अर्थात, त्यासाठी पक्षातील सहकाऱ्यांचं मत घेतलं जाईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर