माजी मंत्री बबनराव घोलप (babanrao Gholap) यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवधनुष्य घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. घोलप यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत आले आहेत. त्याचबरोबर माजी आमदार संजय पवारही आज शिंदे गटात सामील झाले. या पक्षप्रवेश कार्यक्रमात हेमंत गोडसे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभेसाठी इछुक आहेत.
पक्षप्रवेशानंतर घोलप म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेत मी प्रामाणिक व निष्ठेने काम केलं. मात्र तरीही मला संपर्कप्रमुख पदावरून हटवण्यात आलं. पक्षाशी एकनिष्ठ राहूनही माझ्यावर अन्याय करण्यात आला. याबाबत मी विचारलं असता त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. पक्षात होत असलेली घुसमट पाहून मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ते पार पाडणार आहे. शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम केले जाईल, असेही घोलप म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील मंत्री व आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मित्रपक्षाविषयी तक्रार करण्यात आली. अनेक जागांवर पाणी सोडावे लागल्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली. शिरुर मतदारसंघ सोडला मात्र नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली.
बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांना सांगितले की, बैठकीत आमदारांनी नाराजी प्रकट केली मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, सगळीकडे कुरघोरी असतात. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. अनेक पक्ष एकत्र येऊन लढत असतात तेव्हा जागावाटपात तडजोडी कराव्या लागतात. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा. आपल्या मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी लढायचं आहे. किती जागांवर लढतो हे महत्वाचं नाही. भाजप मोठा पक्ष असल्याने काही जागा जास्त लढवत आहे. त्याने काही फरक पडत नाही. मात्र ज्यांना लोकसभेला तिकीट दिले नाही, त्यांचे भविष्यात योग्य प्रकारे पुनर्वसन केले जाईल. असा विश्वासही विमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या