Pune khadkwasla crime news: पुण्यातील सिंहगड पायथा फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार व डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांचे दोन महिन्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांना २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, पैसे न दिल्याने त्यांची तासाभरातच निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून खडकवासला पाणलोट क्षेत्रात फेकून देण्यात आले होते. पोळेकर यांच्या हत्ते प्रकरणी तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. आता पोलिसांनी , मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.
सिंहगड पायथा परिसरातून शासकीय ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोल्हापूरातून अटक केली आहे. पोेळेकर खून प्रकरणात भामे गेले दोन महिने पसार होता.
ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पायथा परिसरातील डोणजे गावातील पोळेकरवाडीत विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०) राहायला होते. आरोपी योगेश भामे डोणजे परिसरात राहायला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्याने पोळेकर यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. १४ नोव्हेंबरqr २०२४ रोजी भामे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी पोळेकर यांचे मोटारीतून अपहरण केले. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार करुन खून केला. खून केल्यानंतर अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते. याप्रकरणात भामे याचे साथीदार शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचली गुरव, जि . अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात ( वय २४, र. बेलगाव , अहिल्यानगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मुख्य सूत्रधार भामे पसार झाला होता. गेले दोन महिने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
भामे कोल्हापूरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोळेकर यांच्या खुनामागचे नेमके कारण काय ? फरार झाल्यानंतर तो कोठे वास्तव्यास होता ? त्याला आश्रय काेणी दिला, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गुंड योगेश भामे गेले दोन महिने फरारी होता. त्याला आश्रय देणारे, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सागर पवार, उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय सुलनासे, रामदास बाबर, राजू मोमीन, अतुल डेरे, अभिजित एकशिंगे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे यांनी ही कारवाई केली.
संबंधित बातम्या