टीम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज तसेच अभिनेता सलील अंकोला याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. डेक्कन भागातील गल्ली क्रमांक १४ मधील घरात सलील अंकोलाच्या आई मृतावस्थेत आढळल्या. कामवाली बाई आल्यानंतर ही घटना समोर आली. माला अशोक अंकोला असं त्यांचं नाव असून त्या ७७ वर्षांच्या होत्या आणि त्या पुण्यात एकट्याच रहात असल्याची माहिती आहे.
पुण्यातील प्रभात रोडवर असलेल्या राहत्या घरात त्यांचा मृत्यू झाला आहे. सलील अंकोलाने इंस्टाग्रामवरुन पोस्ट करुन गुड बाय मॉम असं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माला अशोक अंकोला यांच्या गळा चिरण्यात आलेला आहे. त्यामुळे हा खून आहे, घातपात आहे किंवा इतर काही याचा तपास पोलीस करत आहेत.
आज सकाळच्या सुमारास घरात काम करणारी बाईने बराच वेळ बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी माला अंकोला यांच्या मुलीला फोन केला. त्यानंतर मुलीने वडिलांना याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांचे पती घरी आले. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी माला अंकोला या रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची जखम होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
कोण आहे सलील अंकोला?
सलिल अंकोलाने महाराष्ट्र संघातून आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी भारतीय कसोटी संघात डेब्यू केला होता. त्यानंतर एकदिवसीय संघातही डेब्यू केला. १९९६ च्या विश्वचषक संघाचा ते हिस्सा होते. मात्र त्याचे क्रिकेट करिअर १९९७ मध्ये संपले होते. वयाच्या २९ वर्षी अंकोलाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अंकोलाने एक टेस्टमध्ये २ आणि २० एकदिवसीय सामन्यात १३ विकेट घेतले होते.
माला अंकोला यांचे पती म्हणजे सलीलचे वडिल हे आयपीएस अधिकारी होते. सलील अंकोला माजी भारतीय क्रिकेटपटू असून १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.