Vasant More joins shiv sena ubt : मनसेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज अनेक पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मोरे यांचं पक्षात स्वागत केलं. मोरे यांच्या प्रवेशामुळं पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे.
‘मातोश्री’ निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर हेही उपस्थित होते. वसंत मोरे यांच्या सोबत यावेळी मनसेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी आले होते. त्यांनीही शिवबंधन बांधून मशाला हाती घेतली.
शिवसैनिकच परतले आहेत, त्यामुळं काय बोलावं हे कळत नाहीए. पण वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी हे मूळचे शिवसैनिक आहेत याच समाधान आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीही आमचं वसंत मोरे यांच्यावर लक्ष होतं. ते काय करतात हे बघत होतो. मधल्या काळात ते वाट चुकले होते असं मी म्हणणार नाही. पण शिवसेनेच्या बाहेर इतर पक्षात काय वागणूक मिळते? किती मानसन्मान मिळतो? मिळतो का? याचा अनुभव वसंत मोरे यांनी घेतला आहे. ते आता परिपक्व होऊन आले आहेत. त्याचंं महत्त्व आणि जबाबदारी आता मोठी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'वसंत मोरे यांना शिवबंधन बांधत असताना अनेक जण म्हणत होते आम्ही आधी शिवसैनिक होतो. असं असताना शिवसेना सोडल्याबद्दल सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. वसंतरावांनाही ती होणार. ही शिक्षा म्हणजे पुण्यात शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक पटीनं शिवसेना वाढली पाहिजे. शिक्षा शब्दश: घेऊ नका. ही एक जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एकेकाळी पुण्यात शिवसेनेचे पाच आमदार होते. तो काळ पुन्हा आणायचा आहे. पुणे भगवामय करायचं आहे. ते काम तुम्ही कराल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
'लोकसभा निवडणुकीत लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची जबाबदारी होती. शिवरायांचा महाराष्ट्र या लढाईत सर्वात पुढं होता. महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली. येणाऱ्या विधानसभेत जी लढाई होणार आहे ती लाचारी, गद्दारी आणि खोकेबाजीची लढाई होणार आहे. त्यात पुणे म्हटल्यानंतर क्रांती आणि विद्येचं माहेरघर आहे. त्यामुळं सत्ताबदलाचा पाया पुण्यातच घातला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या