Bapusaheb Pathare joins NCP-SP : काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे हे स्वगृही परतले आहेत. त्यांनी नुकताच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश अनेकार्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.
कोल्हापुरातील राजे समरजितसिंह घाटगे आणि माजी खासदार सूर्यकांता पाटील यांच्यापाठोपाठ पवारांच्या पक्षात प्रवेश करणारे बापूसाहेब पठारे हे भाजपचे तिसरे नेते आहेत. पठारे यांच्यासह त्यांचे चिरंजीव सुरेंद्र यांच्यासह महादेव पठारे, महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव या तीन माजी नगरसेवकांनीही पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पठारे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पठारे यांनी यापूर्वी २००९ ते २०१४ या कालावधीत तेव्हाच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून वडगाव शेरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, २०१४ मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यानं त्यांना पुन्हा विजय मिळवता आला नाही. त्यानंतर पक्षांतर्गत कलहाचं कारण देत त्यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपनं विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. तेव्हापासून पठारे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नव्हते. मात्र, मतदारसंघातील त्यांचं वर्चस्व हेरून शरद पवारांनी त्यांना पुन्हा सोबत घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुतेक विद्यमान आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात गेले आहेत. त्यामुळं मोठ्या पवारांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची उणीव भासू शकते. तसं होऊ नये म्हणून पवारांनी आधीच फिल्डिंग लावली आहे. लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांनी अनेक असंतुष्टांना गळाला लावून चांगलं यश मिळवलं होतं. यावेळीही त्यांची हीच रणनीती दिसतेय. पठारे यांच्या प्रवेशानं त्या रणनीतीला यश आलं आहे.
शरद पवारांनी पठारे यांना आगामी निवडणुकीचं तिकीट देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसं झाल्यास त्यांचा सामना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले टिंगरे पोर्श कार अपघात प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा व दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आठवडाभरापूर्वीच पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्यांची चौकशी केली होती.