Bhor MLA Shankar Mandekar Miravnuk : भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार व अजित पावर यांचे खास असलेले शंकर मांडेकर यांची पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढून पेढे वाटण्यात आले. त्यांची ही मिरवणूक चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकरणी परवानगी नसतांना वनविभागाच्या जागेतून ही मिरवणूक काढण्यात आल्याने या प्रकरणी मांडेकर यांचे कार्यकर्ते आणि आयोजन व हत्तीचे मालक असलेल्या तासगाव देवस्थानाच्या अध्यक्षावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भोरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांचे मित्र राहुल बलकवडे यांनी व काही कार्यकर्त्यांनी मुळशी तालुक्यातील पीरंगुट जवळील उरवडे गावातून शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मांडेकर यांनी यावेळी हत्तीवरुन पेढे देखील वाटले. यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक व हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री या विजयी मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी या घटनेची दखल घेत या प्रकरणी तक्रार केल्यावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. मांडेकर यांची मिरवणूक काढण्यासाठी सांगलीवरुन हत्ती मागवला होता. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत असल्याने वन विभागाने कारवाई ही कारवाई केली आहे. मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे व हत्तीची मालकी असलेले तासगाव गणपती पंचायतन संस्थांन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी पुणे वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन आदित्य परांजपे यांना या मिरवणूकीचे फोटो मिळाले. यानंतर त्यांनी पौड-मुळशी वनपरिक्षेत्राच्या वनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीवर कारवाई करत, सदर वनाधिकाऱ्यांनी कार्यक्रम आयोजकाविरुद्ध चौकशी सुरू केली.
पौड-मुळशी वनपरिक्षेत्राचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रताप जगताप म्हणाले, “वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार परवानगी नसलेल्या हत्तींच्या मिरवणुकीची तक्रार आणि फोटो मिळाल्यानंतर आम्ही आयोजकांकडे त्याबद्दल चौकशी केली. आयोजकांनी सांगितले की त्यांनी हत्तींच्या वाहतुकीसाठी तसेच मिरवणुकीसाठी आवश्यक परवानगी घेतली आहे. तथापि, संबंधित कागदपत्रे असलेली व्यक्ती मुंबईत आहे आणि उद्या पुण्याला परत येईल. म्हणून, संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी त्या व्यक्तीने एक दिवसाचा वेळ मागितला आहे. आम्ही तक्रारदाराने आमच्यासोबत शेअर केलेल्या फोटोंची पडताळणी करत आहोत.”
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील गणपती पंचायत देवस्थानच्या अध्यक्षांच्या मालकीची एक मादी हत्तीणी सांगली वन विभागाकडून परवानगी घेतल्यानंतर पुण्यात आणण्यात आल्याचे समोर आले आहे.
परांजपे म्हणाले, "मला परवानगीची प्रत मिळाली ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की वन्यजीव (संवर्धन) कायदा १९७२ कलम ४० (२) अंतर्गत केवळ वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली होती. प्रतीत असेही म्हटले होते की हत्तीचा वापर कोणत्याही मिरवणुकीसाठी करता येणार नाही. तथापि, आमदार आणि त्यांच्या मित्रांनी त्या अटींचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे आणि म्हणूनच, आयोजक तसेच या कार्यक्रमात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मी वन अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे."
या बाबत आमदार मांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "माझा विजय साजरा करण्यासाठी गावकऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. हत्तीशी संबंधित परवानग्या आयोजकांनी घेतल्या होत्या आणि मला त्याची माहिती नव्हती. हा कार्यक्रम माझ्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला असल्याने, गावकऱ्यांचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मी तिथे गेलो होतो.
शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली. पेढे वाटण्यात आले, जंगी उत्साह साजरा करण्यात आला. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित बातम्या