मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत जेलमध्ये बंद महिला कैद्यांना ‘टेन्शन फ्री’ ठेवतय ‘हे’ खास FM Radio station

मुंबईत जेलमध्ये बंद महिला कैद्यांना ‘टेन्शन फ्री’ ठेवतय ‘हे’ खास FM Radio station

Jan 29, 2024 04:32 PM IST

मुंबईत भायखळा येथील महिला कारागृहागातील कैद्यांसाठी एक एफएम रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं असून याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या एफएम रेडिओच्या माध्यमातून कैद्यांची आवडती गाणी, कथाकथन, माहितीपर गोष्टींचे कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे.

जेलमध्ये बंद महिला कैद्यांना ‘टेंशन फ्री’ ठेवतय ‘हे’ खास FM Radio station
जेलमध्ये बंद महिला कैद्यांना ‘टेंशन फ्री’ ठेवतय ‘हे’ खास FM Radio station

मुंबईतलं भायखळा कारागृह हे देशातलं सर्वात मोठं महिला कारागृह मानलं जातं. भायखळा कारागृहात एकूण १२ बराकी असून येथे अंदाजे ७८० कैदी ठेवलेले आहेत. २०१७ साली येथे मंजुळा शेट्ये नावाच्या एका महिला कैद्याचा मारहाणीत खून झाला होता. या घटनेनंतर कारागृहातलं वातावरण सुधारण्यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून कारागृहागातील कैद्यांसाठी एक एफएम रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं असून याला चांगला, सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. २२ डिसेंबर २०२३ रोजी या एफएम रेडिओची सुरूवात झाली. फक्त कारागृहाअंतर्गत कैद्यांना या रेडिओवरचे कार्यक्रम ऐकू येतात. रेडिओवर दरदिवशी आवडती गाणी, कथाकथन, गोष्टींचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे कैद्यांच्या फरमाईशनुसार त्यांच्या आवडीची गाणी या एफएम स्टेशनवरून वाजवली जातात. या मनोरंजक आणि उदबोधनपर कार्यक्रमांचा कैद्यांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होत असून एफएम रेडिओवरील कार्यक्रम ऐकून आमचा मूड फ्रेश होतो, तुरुंगात असताना देखील आम्ही काही काळ का होईना चिंतामुक्त होतो, अशी प्रतिक्रिया कैद्यांकडून प्राप्त झाल्या आहेत.

पूर्वी रेडिओ एफएमची सेवा केवळ पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह आणि कोल्हापूरजवळील कळंब मध्यवर्ती कारागृहांपुरतीच मर्यादित होती.

राज्यातल्या कारागृहांमध्ये एफएम रेडिओची सुरूवात कशी झाली, याची एक गमतीशीर किस्सा आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तत्कालीन आरोपी, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने कारागृहात रेडिओ जॉकी (RJ) म्हणून काम केले होते. येरवड्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कारागृह प्रशासनाने राज्यात सर्व प्रमुख कारागृहांमध्ये एफएम रेडिओ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

ट्रेंडिंग न्यूज

कारागृहांतर्गत स्वत:ची एफएम रेडिओ सेवा सुरू करणारं भायखळा हे राज्यातलं पहिलं कारागृह आहे. राज्यातल्या इतर कारागृहांप्रमाणे याही कारागृहात कैद्यांची कडक दिनचर्या असते. कैद्यांना सकाळी ७ वाजता त्यांच्या कोठड्यांमधून बाहेर सोडलं जातं. त्यानंतर त्यांना नाश्ता दिला जातो. सकाळी १०.३० वाजता दुपारचे जेवण दिले जाते. दुपारी १२ वाजेपर्यंत कैद्यांना पुन्हा बॅरेकमध्ये पाठवलं जातं. दुपारी ३ वाजता त्यांना पुन्हा चहा पिण्यासाठी बराकमधू बाहेर सोडलं जातं. त्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजता कैद्यांना जेवण दिलं जात. सायंकाळी सहा वाजता त्यांना रात्रीसाठी परत बॅरेकमध्ये पाठवलं जात.

‘दुपारच्या वेळी कैदी आपल्या कोठडीत शांत बसलेले असताना ते रेडिओ सेवेचा आनंद घेतात. हीच त्यांच्यासाठी योग्य वेळ असते’ अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

‘कारागृहातील सार्वजनिक उदघोषण प्रणाली साधारणपणे सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत कैद्यांच्या कोर्टाच्या तारखा आणि कैद्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटीसाठीच्या मुलाखतींची माहिती जाहीर करण्यात व्यस्त असते. साधारण दुपारी १२ ते ३ या वेळेतला स्लॉट मोकळा असल्याने त्यावेळी रेडिओ सेवा प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला’ अशी माहिती भायखळा महिला कारागृहाचे अधीक्षक विकास राजनलवार यांनी दिली.

आरजे

भायखळा कारागृह प्रशासनाने आरजे निवडीसाठी ऑडिशनच्या तीन फेऱ्या घेतल्या होत्या. कारागृहातील सुमारे २५ कैद्यांनी ऑडिशनमध्ये भाग घेतला होता. यात श्रद्धा चौगुले हिची आरजे म्हणून निवड करण्यात आली असून ती राज्यातील पहिली महिला रेडिओ जॉकी ठरली आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.

चौगुले एका कनिष्ठ सहकाऱ्यासोबत मिळून रेडिओ मालिकांसाठी पटकथा लिहिण्याचे आणि कैद्यांकडून गाण्याच्या विनंत्या किंवा कायदेशीर प्रश्न गोळा करण्याचे काम करते. दुपारी १२ ते ३ या वेळेत ती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. यात भजने, आध्यात्मिक गीते, प्रेरक गीते, मुलाखती, समुपदेशन, मिमिक्री आणि कायद्याशी संबंधित माहिती अशा माहितीचा समावेश असतो.

'आपकी की फरमाइश' या कार्यक्रमांतर्गत कैद्यांकडून त्यांच्या आवडीच्या गाण्यांची मागणी केली जाते. या कारागृहात ५४ हून अधिक परदेशी महिला कैदी आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने हिंदी, मराठी आणि इंग्रजी गाणी वाजवली जातात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर