Maharashtra Rain and Flood Update : गेल्या २४ तासांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु सतत जोरदार पाऊस होत असल्यामुळं राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विदर्भातील भंडारा आणि गडचिरोली तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नदी आणि नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. परिणामी हतनूर नदीला पूर आला आहे. पूराचं पाणी रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेशातील जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या पावसामुळं देखील उत्तर महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तापी, नर्मदा आणि पूर्णा या नद्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहे. त्यानंतर आता पूरग्रस्त खिरवाड, निंबोल, एनपूर, धूर खेडा, नुंभोरा सिम या गावांतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
विदर्भातील गडचिरोली आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं गोसेखुर्द धरण ओव्हरफ्लो झालं आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पैनगंगा, वैनगंगा आणि धापेवाडा नदीला पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळं प्रशासनाकडून दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.