Gadchiroli Flood : महाराष्ट्र कोरडाठाक असताना गडचिरोलीत पूरस्थिती, राष्ट्रीय महामार्ग बंद
Gadchiroli Flood : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु विदर्भातील गडचिरोलीत मुसळधार पाऊस होत असल्याचं चित्र आहे.
gadchiroli flood news live today in marathi : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परिणामी यंदाच्या खरीप हंगामातील पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता गडचिरोलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळं गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यानंतर आता नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गेल्या ४८ तासांपासून विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं विभागातील वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांना पूर आला आहे. नद्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर आता गोसेखुर्द, तोतलाडोह आणि धापेवाडा या धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. या तिन्ही धरणांतून साडेसहा लाख क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मुसळधार पावसामुळं वैनगंगेला पूर आला आहे. त्यामुळं आरमोरी मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थितीवर लक्ष ठेवून आहे. स्थिती उद्भवल्यास तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.