Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झल्या आहेत. या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. बेकायदेशीर धंदे बंद करण्यासाठी व पैशांचा काळा बाजार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात खेड शिवापुर येथे तब्बल ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना विविध तपास यंत्रणांनी गेल्या २५ तासात राज्यात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता व रोख जप्त केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे गैर प्रकार टाळण्यासाठी कारवाई केली जात आहे. या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर पर्यंत केलेय कारवाईत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील १९ अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करत मोठी कारवाई केली आहे. विविध ठिकाणी वापरलेले पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांची तपासणी नाकाबंदी करत, छापे टाकत कारवाई करत ही मालमत्ता जप्त केली आहे.
यात इन्कमटॅक्स डिपार्टमेन्ट विभागाने तब्बल ३०, ९३, ९२, ५७३ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर रेव्हयून्यू इन्टेलिजन्स विभागाने ८,३०,८४,८७८ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर पोलिसांनी ८, १०,१२,८११ मालमत्ता जप्त केली आहे. नार्कोटिस्ट कन्ट्रोल ब्युरोने २,५०,००,००० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १,७५,००,३९२, तर कस्टम डिपार्टमेंटने ७२,६५,७५४ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ही कारवाई नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांकरण्यात आली आहे. निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. प्रत्येक कारवाईचा सखोल तपास केला जाणार आहे. आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या साठी मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु आहे. काही चुकीचे आढळल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाकडे १८००२२१५१० या टोल फ्री क्रमांक ८९७६१७६२७६ आणि ८९७६१७६७७६ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा mumbai.addidit.inv7@incometax.gov.in या ईमेलवर तक्रारी नोंदवू शकतात.
राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) अॅपवर एकूण ११४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११४२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.