विमानाच्या धडकेत मुंबईत ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू; आकाशात उडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला विमान धडकले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विमानाच्या धडकेत मुंबईत ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू; आकाशात उडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला विमान धडकले

विमानाच्या धडकेत मुंबईत ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू; आकाशात उडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला विमान धडकले

May 21, 2024 03:29 PM IST

Flamingo Killed in Mumbai: आकाशात उडणाऱ्या फ्लेंमिगो पक्ष्यांच्या थव्याला मुंबई विमानतळावर लँडिंग होत असलेल्या एका विमानाची जोरदार धडक बसल्याने ३६ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

flemingo killed be plane in mumbai
flemingo killed be plane in mumbai

मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या एका विमानाची फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला धडक बसल्याने ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरच्या पंतनगर येथील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी रात्री घडली आहे. आणखी जखमी फ्लेमिंगोंचा परिसरात शोध घेणे सुरू आहे.

मुंबई विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईके ५०८ क्रमांकाचे अमिराती कंपनीचे विमान काल, सोमवारी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरत असताना ही घटना घडली. विमान लँडिंगसाठी अंतिम टप्प्यात असताना ही घटना घडली. परंतु पक्ष्यांची धडक बसल्याने लँडिंगवर काही परिणाम झाला नाही. विमान सुरक्षितपणे खाली उतरण्यात पायलट यशस्वी झाला. विमान उतरताच फ्लेमिंगो पक्ष्यांना धडक बसल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांना देण्यात आली. सध्या हे विमान ग्राऊंड करण्यात आले असून एअरक्राफ्ट इंजिनियर या विमानाची तपासणी करत आहे.

खारफुटी संरक्षण कक्षाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एस. वाय. रामाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात २९ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले आहे. या घटनेत आणखी फ्लेमिंगो मारले गेले आहेत का, याचा शोध सुरू आहे. लक्ष्मीनगरजवळ (घाटकोपर पूर्वेचे उत्तर टोक) येथे हा प्रकार घडला असून विमानतळ प्रशासनाने विमानाची पक्ष्यांना धडक बसल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. खारफुटी संरक्षण कक्षाचे उपसंरक्षक दीपक खाडे यांनी ही माहिती दिली.

खारफुटी संरक्षण कक्षाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत बहादूरे म्हणाले, 'मी विमानतळावर गेलो असता अधिकाऱ्यांनी मला प्रवेश दिला नाही. या फ्लेमिंगोंना अमिरातीच्या विमानाने धडक दिल्याचे विमानतळ प्रशासनाने आम्हाला सांगितले आहे. ही घटना रात्री ८.४०- ते ८.५० च्या दरम्यान घडली असावी. आम्हाला स्थानिक रहिवाशांकडून फोन आला. त्यानंतर रात्री सव्वा नऊ वाजता आमची टीम घटनास्थळी पोहोचली होती.

‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेचे पर्यावरणवादी डी. स्टॅलिन म्हणाले, 'पक्षी कशामुळे विमानावर धडकले याचा तपास केला जात आहे. अभयारण्य क्षेत्रातून जाणाऱ्या नवीन वीजवाहिन्यांमुळे पक्ष्यांची दिशाभूल होत आहे, असा माझा अंदाज आहे. त्याला कधीच परवानगी द्यायला नको होती. पर्यायी मार्ग अनेक होते. वीजवाहिन्यांना परवानग्या देताना (पूर्वी अभयारण्यात प्रवेश दिला जात नव्हता) वन्यजीव मंडळाने वीज कंपनीसमोर शरणागती पत्करली होती. ठाणे खाडी वन्यजीव अभयारण्य नष्ट करून वीजकंपनीने टॉवर्स उभारले आहे, असं स्टॅलिन म्हणाले.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना पक्ष्यांची धडक बसू शकते, असा दावा सिडकोने केला होता. त्यामुळे नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्स परिसरातील पाणथळ जागेतील आणि टीएस चाणक्य तलावातील फ्लेमिंगोच्या कळपांना गेल्या महिन्यापासून त्रास देऊन हुसकावून लावण्यात येत असल्याचं स्टॅलिन म्हणाले. सोमवारी रात्री देखील कुणीतरी या पक्ष्यांचा पाठलाग केला असावा आणि फ्लेमिंगोचा थवा ठाणे खाडीच्या दिशेने उडण्याचा प्रयत्न करत असावा आणि या दरम्यान त्यांचा अपघात झाला असावा, अशी शक्यता स्टॅलिन यांनी बोलून दाखवली.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर