Nashik News: नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. तपासात एक अज्ञात महिला रुग्णालयाबाहेरून बाळाला घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमन अब्दुल खान नावाच्या महिलेची २९ डिसेंबर २०२४ रोजी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. त्यानंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. सुमन रुग्णालयात असताना संशयित महिलेने तिच्या कुटुंबाशी ओळख वाढवली. सुमन आणि त्यांच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देत असताना ही महिला त्यांच्याजवळ आली. तसेच बाळाला खाली गाडीपर्यंत घेऊन जाते, असे म्हणाली. गेल्या चार- पाच दिवसांपासून ही महिला आपल्या बाळासोबत खेळायला येत असल्याने सुमन हीने तिच्यावर विश्वास दाखवला आणि बाळाला तिच्या हातात दिले. परंतु, बाळ घेतल्यानंतर ही महिला रुग्णालयातून गायब झाली. आपले बाळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच सुमन यांनी रुग्णालयातच टाहो फोडला.
या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बाळाच्या आईचा जबाब नोंदवून अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात पीडित महिला रुग्णालयाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाळाला घेऊन जात असल्याचे दिसले. या घटनेमुळे रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित बातम्या