Chandrapur Rape News: बदलापूर येथे दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असताना चंद्रपुरात मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना ताब्यात घेतले. जिल्हा मुख्यालयापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नागभीड तालुक्यात १२ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
हरिनारायण मनरे असे या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव आहे. मनरे हा सराईत गुन्हेगार असून याआधीही पोलिसांनी त्याला वेगळ्या गुन्ह्यात अटक केल्याची समजत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या महिलेची ओळख पटवली आणि आरोपीला अटक केली. त्यानंतर या लाजीरवाण्या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी इतर चौघांना ताब्यात घेतले, ज्यात एका १७ वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नागभीड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चंदीगडमधील एका नामांकित शाळेतील बारावीच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बसचालकाला झिरकपूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रझाक (वय २६, रा. मनीमाजरा , चंदीगड) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मे ते जुलैदरम्यान पीडितावर अनेकदा बलात्कार केला. शारिरिक छळ सहन न झाल्याने अखेर अल्पवयीन मुलीने आपल्या आई-वडिलांना आपबीती सांगितली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. जिरकपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक केली.
पीडिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक महिन्यापासून पीडिताचा पाठलाग करत होता आणि मैत्रीसाठी तिच्याशी संपर्क ही साधला होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने कौटुंबिक कार्यक्रमातील तिचे फोटो एडीट करून तिला धमकावले. दरम्यान, १८ मे रोजी पीडिताचे आई-वडील कामावर गेले असताना आरोपी तिच्या घरी गेला आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नकार दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने ६ जुलै आणि २६ जुलैला पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यूटी प्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या चाइल्डलाइन हेल्पलाइनलाही या गुन्ह्याची माहिती देण्यात आली.