ulhasnagar news : राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे. या निवडणुकांत गैर प्रकार रोखण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आले आहे. हे पथके विविध ठिकाणी कारवाई करत आहे. दरम्यान, अहमदनगर येथे जात असतांना एका फूल व्यापाऱ्याचे पैसे सोडण्यासाठी ८५ हजारांची लाच मागणाऱ्या ५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे.
संदीप सिरसवाल आणि संकेत चानपूर अशी दोघांची नावे आहेत तर इतर तिघांची नावे समजू शकली नाही. या प्रकरणी बबन आमले यांनी तक्रार दिली होती. या घटनेचे वृत्त असे की, मुंबईतील फूल व्यापारी बबन आमले हे सात लाख रुपयांची रोख रक्कम फूल उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी अहमदनगरला जात होते. यावेळी त्यांची गाडी काही निवडणूक अधिकाऱ्यांनी अडवली. निवडणूक पथक ३ आणि ६ चे दोन प्रमुख संदीप सिरसवाल आणि संकेत चानपूर यांनी बबन आमले यांची गाडी अडवत त्यांची झडती घेतली. दरम्यान, त्यांच्या गाडीत तब्बल सात लाख रुपयांची रोख आढळल्याने ही रक्कम कुणाची आहे तसेच या बाबत कागद पत्रांची मागणी पथकातील अधिकाऱ्यांनी केली.
यावेळी बबन आमले यांनी ही रक्कम फूल उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं. तसेच रक्कमेचे सर्व आवश्यक कागदपत्र देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दाखवले. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. ही रक्कम त्यांनी जप्त केली.
यानंतर ही रक्कम सोडवायची असल्यास ८५ हजार रुपयांची लाच त्यांनी अधिकाऱ्यांना मागितली. आमले यांना लाच द्यायची नव्हती. त्यांनी याची माहिती लचलुचपत अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी रंगे हात अधिकाऱ्यांना ८५ हजार रुपयांची लाच घेतांना पकडले.
दरम्यान, या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दाखल घेतली. या पाचही अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.