टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; रात्री पार्टी करून आला, सकाळी मृतावस्थेत आढळला!-firstyear tiss student from lucknow found dead at home had returned from party ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; रात्री पार्टी करून आला, सकाळी मृतावस्थेत आढळला!

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; रात्री पार्टी करून आला, सकाळी मृतावस्थेत आढळला!

Aug 25, 2024 11:39 PM IST

TISS student death : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा एक विद्यार्थी अनुराग जयस्वाल याचा राहत्या घरी मृतदेह आढळून आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

The report said that there were 150 students at the party
The report said that there were 150 students at the party

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मुंबईतील चेंबूर इथल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उजेडात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अनुराग जयस्वाल असं या विद्यार्थ्याचंं नाव आहे. तो मूळचा लखनौचा आहे. तो एचआर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. शनिवारी त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये तो मृतावस्थेत आढळला. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, अनुराग जयस्वाल आदल्या रात्री वाशी इथं एका ठिकाणी पार्टी करून घरी परतला होता. शनिवारी सकाळी तो जागा होत नसल्याचं समजताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अनुराग ज्या पार्टीला गेला होता, तिथं १५० विद्यार्थी होते. पार्टीत त्यानं भरपूर मद्यपान केल्याचं सांगितलं जातं. हा रॅगिंगचा प्रकार असल्याचा सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र, त्याच्या सोबत राहणाऱ्या विद्यार्थ्याशी बोलल्यानंतर पोलिसांनी ही शक्यता नाकारली आहे. पार्टीतून परतल्यानंतर तो आजारी पडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

आई-वडील मुंबईत आल्यानंतर शवविच्छेदन

अनुराग जयस्वाल यांच्या आई-वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुंबईत आल्यानंतरच मुलाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात यावं, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडं केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर टीआयएसएसनं विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

‘टीस’कडून अनुरागला श्रद्धांजली

टीआयएसएस मुंबईच्या एचआरएम अँड एलआरच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी अनुराग जयस्वाल यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. या हृदयद्रावक क्षणी आम्ही अनुरागच्या कुटुंबीयांसोबत आहोत. आमच्या सहवेदना आणि प्रार्थना अनुरागच्या कुटुंबियांसोबत कायम राहतील, असं संस्थेनं म्हटलं आहे.

डाव्या-उजव्या संघर्षामुळं 'टीस' चर्चेत

संस्थेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या आणि बदनामी करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल टीआयएसएसनं डाव्या विचारसरणीच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमवर (PSF-TISS) बंदी घातल्यामुळं या आठवड्याच्या सुरुवातीला ही संस्था चर्चेत आली होती. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (अभाविप) अनपेक्षितपणे आपल्या वैचारिक प्रतिस्पर्ध्याला पाठिंबा देत ही बंदी अतार्किक असल्याचं म्हटलं होतं. 

सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावानं १९३६ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेचं १९४४ मध्ये टीआयएसएस असं नामकरण करण्यात आलं होतं. टीस ही मुंबईतील एक नावाजलेली संस्था आहे.

विभाग