महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच अहमदनगर येथील काही भागात लागलेल्या बॅनरने भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. यामध्ये भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पांगरमल येथे सकल ओबीसी समाजाकडून हे बॅनर व पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, जर आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनवर्सन केले नाही तर संपूर्ण ओबीसी समाज भारतीय जनता पार्टी तसेच त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करणार नाही.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर बीडमध्ये मोठा तणाव पाहायला मिळत आहे. राज्यात खूपच अटीतटीच्या लढल्या गेलेल्या या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांना जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या तीन तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. त्यातच आता सकल ओबीसी समाजाकडून लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अहमदनगरच्या पांगरमल येथील माजी सरपंच बाप्पुसाहेब आव्हाड यांनी पांढरीपूल फाटा येथे लावलेल्या या बॅनरची राज्यात चर्चा रंगली आहे.
सरकारनं जर येत्या विधानसभा मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं नाही, तर सकल ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीसह सत्तेत असणऱ्या कोणत्याही पक्षास मतदान करणार नाही, असा इशारा या बॅनर्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर होत आहे. पोस्टरच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्यावरही निशाणा साधला आहे. जे लोक पार्टी किंवा समाजासाठी काहीच योगदान देत नाहीत, त्यांना राज्यसभेवर पाठवून मंत्री केले जाते, मात्र पंकजा मुंडे यांना सोडले जाते.
पंकजा मुंडे महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा ओबीसी चेहरा असलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिली होती. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवने यांनी त्यांचा पराभव केला. या मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. बीडमध्ये पंकजा यांचा पराभव भाजपसाठी मोठी धक्का आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे यांची मोठी कन्या आहेत. त्यांच्या निधनानंतर पंकजा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार बनल्या होत्या.
त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये त्या मंत्रीपदावर होत्या. त्यांची छोटी बहीण प्रीतम मुंडे वडिलांची परंपरागत सीट बीडमधून पोटनिवडणूक जिंकून संसदेत पोहोचली होती. २०१९ मध्ये प्रीतमच्या जागी पंकजा यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उतरवले गेले. मात्र एनसीपी उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. आता दोन्ही बहिणी कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत.