मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. गुरुवारी आज सायंकाळी साडेसात वाजेच्या आसपास अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला गेला. दहीसर भागात ही घटना घडली आहे. घोसाळकर यांना तत्काळ बोरिवलीच्या करूणा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. पैशाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर जवळून दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक यांच्या पत्नी प्रीती घोसाळकर या सध्या नगरसेविका आहेत. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती आहे.
आरोपी मुरीस भाई नावाने ओळखला जातो. तसेच तो समाजसेवक असल्याचे सांगितले जात आहे. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या रागातून तसेच पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आरोपी आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याची माहिती मिळत आहे.
घटेनेची माहिती मिळाताच ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्यने रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत. तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मोठ्याप्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, पण ते मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलावले होते. गोळीबार करण्यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. गोळ्या झाडण्याआधी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केलं. दोघांनी सोबत काम करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मॉरिसने उठून अभिषेक घोसळकर यांच्यावर समोरून गोळीबार केला. तब्बल ५ गोळ्या झाडण्यात आल्या. यातील तीन गोळ्या घोसळकर यांना लागल्या आहेत. गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून स्वत:वर गोळी झाडून संपवलं. त्याच्याच कार्यालयात हे थरार नाट्य झाले. मॉरिस दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता.