मुंबईतील चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील एका दुमजली घराला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत गुप्ता कुटूंबातील ३ लहान मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मुंबई हळहळत असताना तसेच घर पेटत असताना मदतीच्या बहाण्याने आत आलेल्या कोणीतरी या घरातील लाखोच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. गुप्ता कुटुंबाच्या घरातील कपाटातून लाखोंची रोकड आणि १० तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. घर पेटत होत आणि मदत करणारेच घरं लुटत होते.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची ही दुर्घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, या दरम्यान चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास चेंबुरमधील एक दुमजली घराला आग लागली. या अग्निकांडात छेदीराम गुप्ता यांच्यासह एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर रात्रीच्या सुमारास कुटुंबातील अन्य सदस्य घरात आले असता त्यांना तिजोरी तोडलेल्या अवस्थेत दिसली. तिजोरीतील ऐवज चोरीला गेला होता. गुप्ता कुटुंबाच्या घरातून लाखोंची रोकड आणि १०० ग्रॅम सोने चोरीला गेले आहे. याबाबत या कुटुंबाने आज चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आगीत खाक झालेले घर उभे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र आज कोणीही अधिकारी त्यांच्याकडे आले नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुटुंबाला शासनाकडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या नावे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.