Fire breaks out in residential building in Mumbai: मुंबई येथील लालबाग परिसरातील शिरसागर हॉटेलसमोरील तीन मजली इमारतीला आज पहाटे आग लागली. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत एकूण चार जण होरपळले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबईतील लालबाग परिसरातील एसएस रोडवरील मेघवाडी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज पहाटे ५.१० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत एका महिलेसह दहा वर्षांची दोन मुले आणि एक व्यक्ती होरपळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
कुंदा मिलिंद राणे त्यांची मुले अथर्व मिलिंद राणे आणि वैष्णवी मिलिंद राणे आणि अनिकेत विलास दिवलकर अशी या आगीत होरपळलेल्यांची नावे आहेत. कुंदा राणे, अथर्व राणे आणि वैष्णवी राणे यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अनिकेत विलास दिवलकर यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अथर्व राणे आणि वैष्णवी राणे १५ ते २० टक्के होरपळले आहेत. या आगीत दहा वर्षांची दोन मुले १५ ते २० टक्के होरपळले आहेत. तर, कुंदा राणे ७० ते ९० टक्के आणि अनिकेत दिवलकर ६० ते ७० टक्के होरपळल्याची माहिती समोर आली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम २६ च्या स्वयंपाकघरात पहाटे पाचच्या सुमारास लागलेली आग वेगाने एलपीजी गॅस सिलिंडर, घरगुती भांडी, स्वयंपाकघरातील वस्तू आणि कपड्यांपर्यंत पसरली. अग्निशमन दलाने पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.’
विक्रोळीत शनिवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात ९२ टक्के भाजलेल्या राधेश्याम पांडे (वय, ४५) यांचा राजावाडी रुग्णालयात रविवारी मृत्यू झाला. तर, ७० ते ८० टक्के भाजलेल्या धनंजय मिश्रा यांना सुरुवातीला राजावाडी रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यानंतर सायन रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या