Pune Gangadham fire : पुण्यातील कोंढवा खुर्द (kondhwa khurd) येथील गंगाधाम सोसायटीच्या फेज २ मध्ये असणाऱ्या एका सोसायटीत मध्यरात्री १.४८ वाजता सातव्या मजल्यावर असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मीवळत घरात अडकलेल्या पाच जणांची सुटका केली. अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी जात आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.
कोंढवा खुर्द येथे गंगाधाम सोसायटी आहे. या सोसायटीच्या फेज २ मधील विंग जी ५ इमारतीच्या ५ व्या सातव्या मजल्यावर सदनिकेत भीषण आग लागली. या आगीत तब्बल पाच जण अडकून पडले होते. या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. या घटनेची तातडीने दखल घेत अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी गंगाधाम, कोंढवा खुर्द व मुख्यालयातून तीन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर अशी एकूण ०६ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना केली.
महेश बाबुलाल ओसवाल (वय ४१), भक्ती महेश ओसवाल (वय ४१), ऊषा बाबुलाल ओसवाल (वय ६१), आहना महेश ओसवाल (वय ९), आरव महेश ओसवाल (वय ५) अशी आगितून वाचवण्यात आलेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सात मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली असून मोठ्या प्रमाणात धुर निघत होता. जवानांनी तातडीने बचाव मोहीम हाती घेत होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरु केला. दरम्यान, आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला असता जवानांनी आतमध्ये कोणी आहे का याची खात्री करत असतांना बाल्कनीमध्ये कुटूंबातील एकुण पाच जण अडकल्याचे दिसले. यात एक जेष्ठ महिला, एक दांपत्य व त्यांची दोन लहान मुले होती. जवानांनी या सर्वांना सुखरुप बाहेर घेत त्यांची सुटका केली. सुमारे तीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सदनिकेत पुढील खोलीमध्ये असणारया पेटत्या दिव्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल आहे. सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची मदत वेळेवर पोहोचल्याने जवानांनी आग इतरञ पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. या इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंञणा या घटनेवेळी कार्यान्वित नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस जवानांनी सहभाग घेत पाच जणांचे जीव वाचविण्यात यश मिळवले.