Kalyan News: कल्याण येथे मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी राज्य सरकारी कर्मचारी आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कर्मचाऱ्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. आरोपी अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा कर्मचारी आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री असे म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ डिसेंबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. मराठी कुटुंब आणि आरोपी कल्याणमधील एका इमारतीच्या एकाच मजल्यावर राहतात. आरोपी आणि मराठी कुटुंब यांच्यात अगरबत्ती पेटवण्यावरून भांडण झाले. त्यावेळी आरोपी आणि त्यांच्या पत्नीने पीडित कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यावेळी पीडित कुटुंबाने मराठी भाषिक समाजाला शिवीगाळ आणि अपमान करू नये, अशी विनंती केली. मात्र, हे ऐकताच आरोपी दाम्पत्याला राग आला आणि त्याने इतर आठ ते दहा जणांच्या मदतीने पीडित कुटुंबाला मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परब यांनी विधिमंडळाच्या उच्च सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. परराज्यातून येणाऱ्यांकडून मराठी माणसांशी भेदभाव करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मराठी माणसांना रेल्वे प्रवासादरम्यान हल्ले होतात किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनुसार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरे नाकारली जातात. भाजप सत्तेत आल्यापासून मुंबई, पुणे, कल्याण आणि राज्याच्या इतर भागांत मराठी कुटुंबांना परराज्यातील लोकांकडून त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असा आरोप परब यांनी केला.
या घटनेवर बोलताना फडणवीस म्हणाले की,'आरोपी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीचा पीडितांशी वाद झाला आणि त्यांनी त्यांच्याविरोधात अपमानजनक शब्द वापरले. शुक्ला हे एमटीडीसीचे कर्मचारी आहेत. या घटनेनंतर त्यांच्याविरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांना सरकारी नोकरीतून निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मराठी माणसावर अन्याय होणार नाही. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, आहे आणि राहणार. कधी कधी काही नमुने चुकीचे वक्तव्य करतात. माज आल्यासारखे करतात. अशा माजोरड्यंचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.
याप्रकरणी मुख्य आरोपी शुक्ला (वय,४८) आणि त्यांची पत्नी गीता (वय, ४५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), कलम ७४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणे), ११५ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे), ३५१ (३) (गुन्हेगारी धमकी), १८९ (२) (३) आणि (५) (बेकायदेशीर जमाव) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.