Nitin Gadkari : मालपाणी दिल्याशिवाय फाईल हलतच नाही; मंत्र्यांसमोर गडकरींकडून अधिकाऱ्यांची पोलखोल
Nitin Gadkari Speech : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेक विषयावर परखडपणे मत मांडत असतात. आता त्यांनी राज्यातील मंत्र्यांसमोर प्रशासनातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे.
Nitin Gadkari Today Speech In Mumbai : महाराष्ट्रातील शिक्षणमंत्री आणि उद्योगमंत्री मंचावर उपस्थित असताना 'अधिकाऱ्यांना मालपाणी दिल्याशिवाय फाईल हलतच नाही', असं वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यामुळं खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून खुद्द गडकरींनीच सरकारला धारेवर धरल्यानं सभागृहात उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला दाद दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं मुंबईत आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते, त्यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईतील विश्व मराठी संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ज्या लोकांना महिन्याच्या एका तारखेला पगार मिळतो, त्यांना वेळेचं महत्त्व नसतं. व्यवस्थेतला प्रत्येक माणूस त्रास देत असल्यानं परवाने मिळायला फार वेळ लागतो. त्यामुळं लोक कंटाळून निघून जातात आणि आपण मंत्री असल्यामुळं नेमकं काय झालंय, हे आपल्याला सांगतही नाहीत. परंतु अधिकाऱ्यांना मालपाणी दिल्याशिवाय फाईल हलतच नाही, असं वक्तव्य करताच सभागृहात एकच हशा पिकला. याशिवाय उपस्थितांनी त्यांच्या वक्तव्याला जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. त्यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत यांचीही मोठी अडचण झाली. त्यानंतर गडकरींनी महाराष्ट्राबद्दल नाही तर बाहेरच्या राज्यांबाबत बोलत असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कमी मार्क मिळाले म्हणून अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला नाही. परंतु आता बांधकाम क्षेत्रात चांगलं काम केल्यामुळं अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आतापर्यंत चार विद्यापीठांनी मला डी-लीटच्या पदव्या दिल्या आहेत. त्यामुळं विद्वान आणि हुशार असणं यात फरक असतो, असंही म्हणत नितीन गडकरींनी अभियंत्यांचं नाव न घेता त्यांना टोला हाणला आहे.