ambadas danve vs sandipan bhumre : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार कॉंग्रेस आणि ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं. परंतु आता निधीवाटपाच्या मुद्द्यावरून औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली असून अंबादास दानवे हे मंत्री भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री संदीपान भुमरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे एकत्र आले होते. यावेळी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना सरकारकडून निधी मिळत नसल्याची तक्रार करत मंत्री संदीपान भुमरे यांना धारेवर धरलं. त्यानंतर संदीपान भुमरे यांनी देखील दानवेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रकरण वाढल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांनी समंजस भूमिका घेतल्याने वाद मिटला. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी सत्ताधारी मंत्री निधी देत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात झालेल्या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ज्या पक्षाचे आमदार सत्तेत असतात, त्यांना विकासकामांसाठी अधिकचा निधी मिळत असतो. हा अलिखित नियम आहे. परंतु सत्तेत नसतानाही जास्त निधी मिळावा, असं अनेकांना वाटत असतं. पूर्वी आमदारांना जो निधी दिला जात होता, त्यात कुठेही कमी करण्यात आलेली नाही. मग तरीही यांना वाढीव निधी कशासाठी पाहिजे?, मंत्री किंवा पालकमंत्री हे सर्वच आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं कुणी त्यांच्या अंगावर धावून जाणार असेल तर हे सहन केलं जाणार नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली आहे.