मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सचिन जोशी कुठे आहेत? एकनाथ शिंदेंच्या बंडाशी त्यांचं कनेक्शन काय?

सचिन जोशी कुठे आहेत? एकनाथ शिंदेंच्या बंडाशी त्यांचं कनेक्शन काय?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 25, 2022 09:40 AM IST

गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षानंतर आताच बंड का केले, याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. त्यातच आता या बंडामागील कारणांची नवी चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई – महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री व शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून राज्य सरकारही संकटात सापडले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा करत शिवसेनेचे निवडणूक चिन्हे धनु्ष्यबाणावर दावा केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये राजकीय संघर्ष चिघळणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

दरम्यान, एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि ईडीच्या धास्तीने बंडाचा पवित्रा घेतला आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे. त्या बातमीमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून ते ठाण्यातून गायब आहेत. सचिन जोशी कुठे आहेत? आणि त्यांना बजावलेल्या ईडीच्या नोटिशीचा एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी काय संबंध आहे, अशी चर्चा रंगली आहे" असे या बातमीमध्ये म्हटले आहे. मात्र ही बातमी कोणत्या वृत्तपत्रातील आहे याची माहितीनाही.

 

<p>सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट</p>
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते व शिवसेनेच्या जवळपास २० आमदार व खासदारांवर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर चौकशी सुरू आहेत. अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. या नेत्यांना ईडीची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे ईडीने त्रस्त असलेले सर्व नेते एकत्रित होऊन आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू केला आहे. राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये संजय राऊत यांनाही दणका बसला आहे. मिलिंद नार्वेकर, श्रीधर पाटणकर ( रश्मी ठाकरे यांचे बंधू) यांचीही संपत्ती जप्त झाली आहे. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी ईडीची धास्ती घेतली आहे. बंडाळीचे नेतृत्व करत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही ईडीची धास्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसुळ, रवींद्र वायकर, या सर्व नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. यामुळे या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात वेगळी वाट धरली आहे.

सक्तवसुली संचालनालय (ईडी),सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक,यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव हे आमदार व खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. भाजपच्या जवळ गेल्यास निदान केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा तरी सुटेल,असा या लोकप्रतिनिधींना विश्वास वाटत असावा.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या