Father Francis Dibrito Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक व पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्ते फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज पहाटे ५ च्या सुमारास वसईतील राहत्या घरी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज संध्याकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव ही संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी साहित्यिक असून ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय होते. त्यांनी मराठीतून विविध विषयांवर लिखाण केले आहे. ते धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले आहे.
दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर, इ.स. १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. तर त्यांचं शिक्षण हे नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले. १९७२ साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. तर पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात त्यांनी एम.ए. केले.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू होते. असे असले तरी त्यांची ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते अशी होती. त्यांनी अनेक विषयांवर आवाज देखील उठवला आहे. त्यांनी पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात पर्यावरण रक्षणाच्या बाजूने भूमिका घेत लढा दिला आहे. त्यांनी 'सुवार्ता' या मासिकाद्वारे सामाजिक प्रबोधनाचे देखील कार्य केले. त्यांनी या मासिकात लेखन करून विविध विषय मांडले. त्यांनी मराठी साहित्यातही मोलाची भूमिका बजावली. त्यांनी सुवार्ता या मासिकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे १९८३ ते २००७ या काळात 'सुवार्ता'चे मुख्य संपादक राहिले आहेत.
फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील 'राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण' यांच्या विरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. त्यांनी संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन देखील केले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेले 'आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा' हे पुस्तक चांगलेच गाजले. या सोबतच त्यांनी ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र), ख्रिस्ती सण आणि उत्सव, तेजाची पाऊले (ललित), नाही मी एकला (आत्मकथन), संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास, सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद) (पृष्ठसंख्या - ११२५), सृजनाचा मळा, सृजनाचा मोहोर, परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक), मुलांचे बायबल (चरित्र) आदि पुस्तके लिहिली आहेत.
संबंधित बातम्या