मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा मृत्यू; पंढरपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा मृत्यू; पंढरपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 03:09 PM IST

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना पंढरपुरात घडली आहे.

मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा मृत्यू
मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा मृत्यू

सध्या लग्नसराई सुरू असून हळदी व वरातीच्या कार्यक्रमात डीजे, डॉल्बीचा सर्रास वापर होताना दिसत आहे. मात्र डॉल्बीच्या दणदणाटामुळे अनेक लोकांचे बळी गेल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशातच  पंढरपुरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. घरात लग्नकार्य सुरू असताना नवऱ्या मुलाच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  सुभाष देवमारे असे मृत वर पित्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पंढरपुरात  मुलाच्या हळदीत सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला आहे. सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा विवाह आज (मंगळवार) दुपारी होता. त्याच्या एक दिवस आधी सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. डॉल्बीच्या  दणदणाटात हळदीची वरात काढली जात होती. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे नवरदेवाचे पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले. या अचानक घडलेल्या घटनेने नातेवाईक भांबावून गेले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखले केले पंरतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने वरसह नातेवाईकांनी आक्रोश केला.

डॉल्बीच्या अति आवाजामुळे आणि दणदणाटामुळे सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाल्याची बोलले जात आहे. लग्न किंवा अन्य शुभ कार्यामध्ये डॉल्बीचा वापर वाढला आहे. मात्र डॉल्बी अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले अन् आनंदी वातावरण असलेल्या लग्नघरावर मृत्यूकळा आली.

WhatsApp channel