Pune Pavnanagar news : पुणे जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाचव्या व सहाव्या दिवशी अनेकांनी घरगुती गणपतीला निरोप दिला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कडधे गावात घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या बाप लेकावर काळाने घाला घातला आहे. विसर्जन करतांना पाय घसरल्याने बाप लेकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजता कडधे गावाच्या हद्दीत घडली. दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. हे दोघेही बेडसे गावातील रहिवासी आहेत.
संजय धोंडू शिर्के (वय ४५) व हर्षल संजय शिर्के (वय २२) (दोघेही रा. बेडसे तालुका मावळ) असे नदीच्या पात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या बाप-लेकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बेडसे येथे राहणारे संजय शिर्के व त्यांच्या मुलगा हर्षल शिर्के हे घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जवळील कडधे येथे गेले होते. या ठिकाणी खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ते गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. यावेळी मुलगा हर्षल याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. तो बुडत असल्याने वडिलांनी देखील त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कामशेत पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा निलेश गराडे, रमेश कुंभार, शत्रुघ्न रासनकर, ओंकार कालेकर, संतोष दहिभाते, शुभम काकडे यांच्या सह ग्रामस्थांसोबत पाण्यातून बाप लेकाचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार असून आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र दिक्षित, अनिल हपरकर, अगोल ननवरे, रवींद्र रावल हे करत आहे.