Pune accident : दिघीतील लष्कराच्या तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे- नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला.
अमोद कांबळे (वय २७, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यानं त्यातडीने भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मूर्तजा अमीरभाई बोहरा (वय ३२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे वय १७ वर्षे १० महिने आहे. आरोपी मुलगा मुळचा आसामचा असून तो दिघीतील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान आहे. ते आसाम येथे कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या मोटारीमधून भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. यावेळी त्याने दारू प्यायली होती. नशेत त्याने गाडी चालवली. त्याच्यासमवेत त्याचा एक मित्र देखील कारमध्ये होता. आरोपी अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नव्हता. असे असतांना त्याने दारू पिऊन भरधाव वेगात गाडी चालवून वाहनांना धडक दिली.
तपास अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले की, आरोपी चालक १७ वर्षे १० महिन्यांचा आहे. तो मूळचा आसामचा आहे. पुण्यातील दिघी येथील लष्करी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करात सैनिक आहेत. सोमवारी सायंकाळी आरोपीने मद्यप्राशन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर त्याने त्याच्या वडिलांची एसयूव्ही घेऊन अत्यंत वेगाने पुणे नाशिक मार्गावर कार चालवत निघाला. दारूच्या नशेत असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी त्याने काही वाहनांना व दुचाकीला धडक दिली. आरोपी मुलाला किशोर न्याय मंडळासमोर हजर केले असता त्याला बाल निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे.
या घटनेमुळे पुणेकरांना पुन्हा पोर्शे प्रकरणाची आठवण झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की, ती दुभाजकावरून जाऊन कार इतर तीन वाहनांवर जाऊन धडकली. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रिक्षा, स्कूटर आणि मोटारसायकलींना कारने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला अटक केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.