महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भोगीच्या दिवशीच आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माझ्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, राज्य सरकारच्या मागणीनुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही परवानगी दिली आहे.
सोयाबीन खरेदीची मुदत आज (सोमवार) १३ जानेवारी रोजी संपली होती. ती या महिना अखेरपर्यंत वाढवण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभाग सतत कार्यरत आहे. किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू आहे आणि आतापर्यंत आम्ही विक्रमी १३ लाख ६८ हजार ६६० मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे.
१५ ऑक्टोबर २०२४ पासून राज्यात सोयाबीन खरेदी सुरू झाली. त्याची मुदत १३ जानेवारी रोजी संपणार होती.यामुळे अनेक खरेदी केंद्रावर गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. सर्व शेतकऱ्यांचा माल नाफेडला घेता आला नव्हता. यामुळे महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून ३१ जानेवारी करण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करण्यात आली.
आता महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन, मूग, उडदाला हमी दर मिळावा यासाठी नाफेडकडून खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
राज्यातील सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचेआभार मानले आहे. फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांना फोन करून केली होती. ती मागणी त्यांनी लगेच मंजूर करीत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानतो.
संबंधित बातम्या