मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Updates : परतीच्या पावसाचा मराठवाड्यात धुमाकूळ; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसमोर नापिकीचं संकट

Rain Updates : परतीच्या पावसाचा मराठवाड्यात धुमाकूळ; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसमोर नापिकीचं संकट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 22, 2022 09:28 AM IST

Marathwada Rain Updates : सातत्यानं होत असलेल्या पावसामुळं मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain Updates (HT)

Maharashtra Rain Updates : गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कारण सततच्या मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यांतील पिकं सडली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाहून गेल्यानं ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसमोर नापिकीचं संकट ओढावलं आहे. त्यामुळं आता पिकांचे पंचनामे करून विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

औरंगाबादमध्ये पावसाचा कहर, वाघूर नदीला पूर...

गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठणसह सिल्लोड आणि कन्नड तालुक्यांत परतीच्या पावसानं जोर धरला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय सिल्लोड तालुक्यातील वाघूर नदीला पूर आल्यानं अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील अनेक ओढे-नाल्यांनाही पूर आला असून त्यामुळं त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हिंगोलीत ढगफुटीसदृश पाऊस तर परभणीत पिकं पाण्याखाली...

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळं आता काढणीला आलेल्या सोयाबीन, तूर आणि हळदीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय हातातोंडाशी आलेल्या कापसाच्या पिक पाण्याखाली गेलं आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यांत पहाटेपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं ओढे-नाल्यांना पूर आला असून त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...

मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. याशिवाय परतीच्या पावसानं विभागातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. त्यामुळं ऐन दिवाळीतच आता शेतकऱ्यांवर नापिकीचं संकट ओढावलं आहे. त्यामुळं आता मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषिमंत्री

मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. कृषिमंत्री सत्तार यांच्या वक्तव्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

IPL_Entry_Point