sambhaji nagar Farmer suicide : राज्यात संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कुतुबखेडा येथे कर्ज फेडण्यासाठी बँकेची नोटिस आल्याने एका शेतकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध पिऊन जीवन संपवले आहे. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.
नारायण भाऊसाहेब करंगळ (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतकरी नारायण भाऊसाहेब करंगळ यांनी पेरणीसाठी पैठणच्या बँक ऑफ बडोदा बँकेकडून ४ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान, त्यांचे हे कर्ज व्याजासह ७ लाख १२ हजार रूपये झाले होते. हे कर्ज भरण्याबाबत संबंधित बँकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
या वर्षी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. अपुऱ्या पावसा अभावी पेरण्या करूनही पाहिजे तसे उत्पन्न हाती आले नाही. नारायण करंगळ यांच्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना सतावत होता. दरम्यान, बँकेने हे कर्ज फेडण्यासाठी नोटिस पाठवल्याने ते सतत चिंतेत राहायचे. कर्ज फेडायचे की घर चालवायचे, तसेच हा पैसा आणणार कोठून हा प्रश्न त्यांना सतावत असल्याने त्यांनी शनिवारी पुन्हा त्यांना कोर्टामध्ये तडजोड करण्यासाठी यावे अन्यथा तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी नोटिस बँकेने धाडली.
पैसे भरले नाही तर बँकेचे अधिकारी तगादा लावतील यामुळे त्यांनी रविवारी रात्री शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले. यानंतर ते घरी आले. त्यांनी विष प्राशन केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नातेवाइकांना दिली. नातेवाईकांनी नारायण करंगळ यांना जवळील पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संबंधित बातम्या